ताज्या घडामोडी

साखर सुतारवाडीतील दरडग्रस्त हक्काच्या घरांच्या प्रतीक्षेत

१५ ऑगस्ट रोजी करणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

व्हाटस अप ग्रुप ला जॉइन व्हा

पोलादपूर संदिप जाबडे

Download Aadvaith Global APP

पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरे ही जमिनोधोस्त झाली होती. दुर्घटना घडल्यानंतर भेट देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मंत्री, रायगडचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दरडग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर राज्य शासनामार्फत केले जाईल असे आश्वासित केले. आपत्तीग्रस्त कुटुंबियांना तात्पुरत्या निवारासाठी कंटेनर केबिनची व्यवस्था करण्यात आली. मात्र या घटनेला तीन वर्षे उलटूनही अजूनही साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. साखर सुतारवाडी येथील पुनर्वसित घरांचे काम हे अद्याप रखडलेले आहे. घरांच्या पुनर्वसनाठी प्रत्येकी केवळ दोन लाख तीस हजार रुपयांचा निधी राज्य सरकार मार्फत उपलब्ध होत असून या निधीत घरांचे काम कदापि शक्य नसल्याने येथील ग्रामस्थांनी यास नकारात्मकता दर्शवली आहे.
यातच २२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या दरड दुर्घटनेतील पीडितांना मागील वर्षभरापासून घरे मिळण्याचे सत्र सुरू आहे. या घरांसाठी शासनाने मुबलक निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. परंतु साखर सुतारवाडी बाबत शासन इतके उदासीन का? हा प्रश्न आता येथील नागरिकांना पडला आहे.
साखर सुतारवाडी येथील घरांच्या पुनर्वसनासाठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा व आम्हाला आमच्या हक्काची घरे मिळावी ह्या प्रमुख मागणीसह मागील तीन वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांना शासनाने भाड्याचे पैसे द्यावे अशी मागणी माननीय तहसीलदार यांना दिलेल्या पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

शासनाच्या उदासीन भूमिके विरोधात साखर सुतारवाडी येथील संतप्त ग्रामस्थ भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी पोलादपूर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र तहसीलदार कपिल घोरपडे यांना ६ ऑगस्ट रोजी सुपूर्द केले. त्यामुळे शासनाने याच्यावर काय ठोस निर्णय घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी,फोटो,विडियो परवानगी शिवाय कॉपी करू नये